ऊसदर आंदोलन अखेर मागे! शेतकऱ्यांना ३,९०० रुपये पहिली उचल; अंतिम दर ४,२०० रुपयांपर्यंत मिळणार?
तीन दिवसांच्या ऊसदर आंदोलनानंतर अखेर तोडगा निघाला आहे. ऊस उत्पादकांना प्रतिटन विनाकपात ३,९०० रुपये पहिली उचल, हंगामानंतर १०० रुपये आणि साखरेच्या दरानुसार अतिरिक्त २०० रुपये देण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे.
- लेखक / प्रतिनिधी
- जय किसान डेस्क
- प्रकाशित तारीख
- ६ नोव्हेंबर, २०२६
- प्रकाशित वेळ
- सकाळी १०:४१
- शेवटचे अपडेट
- ६ नोव्हेंबर, २०२६, सकाळी १०:४४

कोल्हापूर : ऊसदराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेले तीन दिवसांचे चक्काजाम आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी पहाटे पावणेएकच्या सुमारास किणी टोलनाक्यावर आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. त्यानंतर शेतकऱ्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
ऊसाला पहिली उचल किती मिळणार?
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत साखर कारखानदारांनी ऊस उत्पादकांना प्रतिटन विनाकपात ३,९०० रुपये पहिली उचल देण्याचा प्रस्ताव मान्य केला.
याशिवाय हंगाम संपल्यानंतर आणखी १०० रुपये देण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिटन एकूण ४,००० रुपये मिळण्याचे निश्चित झाले आहे.
अंतिम ऊसदर ४,२०० रुपये कसा मिळणार?
साखरेचा दर प्रतिक्विंटल ४,५०० रुपयांपेक्षा अधिक राहिल्यास कारखान्यांकडून आणखी २०० रुपये प्रतिटन देण्यात येणार आहेत.
त्यामुळे अट पूर्ण झाल्यास शेतकऱ्यांना एकूण ४,२०० रुपये प्रतिटन मिळू शकतात. ऊसदराचा टप्पा प्रतिटन रक्कम पहिली उचल (विनाकपात) ₹३,९०० हंगाम संपल्यानंतर ₹१०० निश्चित एकूण रक्कम ₹४,००० साखरेच्या दरानुसार अतिरिक्त ₹२०० अट पूर्ण झाल्यास अंतिम दर ₹४,२००
राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली
शेतकऱ्यांना प्रतिटन ४,००० रुपये एकरकमी मिळावेत, या मागणीवर शेवटपर्यंत ठाम होतो. मात्र इतर संघटनांची भूमिका आणि वाहतूकदारांसह पोलीस प्रशासनाची परिस्थिती लक्षात घेऊन आंदोलन मागे घेतल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.
आंदोलनामुळे प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली.
जिल्हाधिकाऱ्यांकडून लेखी आश्वासन
साखरेचा दर प्रतिक्विंटल ४,५०० रुपयांपेक्षा अधिक राहिल्यास अतिरिक्त २०० रुपये देण्याबाबत जिल्हाधिकारी विजयसिंह राठोड यांनी पत्र दिल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
सांगली आणि सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदारांनीही हाच तोडगा स्वीकारावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पुणे-बंगळूर महामार्गावरील वाहतूक सुरू
आंदोलन मागे घेतल्यानंतर किणी टोलनाक्यासह पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनात हजारो शेतकरी सहभागी झाले होते.



