चारा-पाणी टंचाईचा पशुपालकांना मोठा फटका; गाई-म्हशींचे दर घसरले!
दुष्काळी परिस्थिती आणि चारा-पाण्याच्या वाढत्या टंचाईमुळे पशुपालक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब (ता. माढा) येथील जनावरांच्या आठवडा बाजारात गाई-म्हशींच्या किमतीत मोठी घसरण झाली असून, जनावरे विकूनही शेतकऱ्यांच्या हातात अपेक्षित पैसे मिळत नसल्याचे चित्र आहे.
- लेखक / प्रतिनिधी
- जय किसान डेस्क
- प्रकाशित तारीख
- २४ ऑक्टोबर, २०२६
- प्रकाशित वेळ
- दुपारी २:१५
- शेवटचे अपडेट
- २४ ऑक्टोबर, २०२६, दुपारी २:२२

दुष्काळी परिस्थिती आणि चारा-पाण्याच्या वाढत्या टंचाईमुळे पशुपालक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब (ता. माढा) येथील जनावरांच्या आठवडा बाजारात गाई-म्हशींच्या किमतीत मोठी घसरण झाली असून, जनावरे विकूनही शेतकऱ्यांच्या हातात अपेक्षित पैसे मिळत नसल्याचे चित्र आहे.
सहा महिन्यांपूर्वी सुमारे एक लाख रुपयांना विकली जाणारी संकरित गाय आता अवघ्या ४५ ते ५० हजार रुपयांना विकली जात आहे. तर दीड लाख रुपयांपर्यंत किंमत असलेल्या दुभत्या म्हशींचे दरही ९० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत खाली आले आहेत.
चारा-पाण्यासाठी जनावरे विकण्याची वेळ
माळशिरस, पंढरपूर, मोहोळ आणि तुळजापूर परिसरातील शेतकरी मोडनिंब बाजारात जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी येतात. मात्र, जनावरांना पुरेसा चारा आणि पाणी मिळत नसल्याने अनेक शेतकरी जनावरांची संख्या कमी करत आहेत. काही शेतकऱ्यांना उर्वरित जनावरे सांभाळण्यासाठी दोन-तीन जनावरे विकावी लागत आहेत.
विशेष म्हणजे, जनावरांच्या किमती घसरल्या असल्या तरी या परिसरात दररोज १५ हजार लिटरपेक्षा अधिक दूध संकलित होत आहे. गाईच्या दुधाला प्रतिलिटर ४० ते ४२ रुपये, तर म्हशीच्या दुधाला सुमारे ७० रुपये दर मिळत असल्याचे सांगितले जाते. तरीही चारा-पाण्याचा वाढता खर्च पशुपालकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.
निम्म्या किमतीतही खरेदीदार मिळेनात! पडसाळी (ता. माढा) येथील पशुपालक दादा फरड यांनीही बाजारातील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. दुसऱ्या वेताची गाय विक्रीसाठी आणली असून, पूर्वी ८० हजार रुपये किंमत असलेल्या गाईला आता ४५ हजार रुपये मिळाले तरी विकण्याची तयारी आहे. मात्र, कमी दरातही खरेदीदार पुढे येत नसल्याने पशुपालकांची अडचण वाढली आहे.
चारा-पाण्याची टंचाई आणि जनावरांच्या घसरलेल्या किमती यामुळे पशुपालक शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
