शेतकरी कर्जमाफीची चौथी यादी आली! १.१५ लाख शेतकऱ्यांना लाभाची संधी
राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत चौथ्या यादीत १ लाख १५ हजार ६९७ पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे लागणार आहे.
- लेखक / प्रतिनिधी
- जय किसान डेस्क
- प्रकाशित तारीख
- २३ ऑक्टोबर, २०२६
- प्रकाशित वेळ
- दुपारी १२:५२
- शेवटचे अपडेट
- २३ ऑक्टोबर, २०२६, दुपारी २:०५
- बातमीचा स्रोत
- ऑनलाइन

कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ?
एकापेक्षा जास्त बँकांमधून पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित कर्जखात्यांची ३१ मार्च २०२६ रोजीची थकबाकी विचारात घेतली जाणार आहे. काही राष्ट्रीयीकृत आणि व्यापारी बँकांमधील कर्जांसाठी शासनाच्या ‘हेअरकट’ धोरणानुसार कर्जमुक्तीची कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
आतापर्यंत किती शेतकऱ्यांना मिळाली कर्जमाफी?
योजनेअंतर्गत पहिल्या तीन याद्यांमध्ये एकूण २४ लाख ६७ हजार १३० शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध झाली आहेत. त्यापैकी आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या १५.८५ लाख पात्र लाभार्थ्यांच्या कर्जखात्यांवर आतापर्यंत १३ हजार २७५ कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली.
शेतकऱ्यांनी पुढे काय करावे?
चौथ्या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी सर्वप्रथम आपल्या कर्जखात्यावरील ३१ मार्च २०२६ रोजीची थकबाकी तपासून घ्यावी. त्यानंतर जवळच्या आपले सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी. संबंधित यादी बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
योजनेच्या नियमानुसार आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी यादीतील आपले नाव तपासून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे आहे



